काही वर्षांपूर्वी मी मुंबईत “मुंबई फ़र्स्ट ” आणि “मेकिंग अ डिफरेंस -M.A.D” तर्फे आयोजित एका आर्ट प्रोजेक्टवर काम करत होतो. मुंबईतील जवळपास 25 एक रेल्वे स्थानक सुशोभित करण्याचा हा प्रकल्प होता.

अशा सुंदर प्रकल्पाचा भाग होण्याचा अनुभव छानच होता.पण त्यापेक्षाही चांगला अनुभव तिथून ये जा करण्यारया प्रवाशांशी गप्पा मारताना आला.
प्रत्येक पिढीचा माझ्याशी गप्पा मारण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा होता. माझ्या कामाचे कौतुक करणारी वृद्ध पिढी जितकी रसिक होती तितकीच बहुतेक तरुण पिढी अरसिक जाणवली मला.

अर्थात काही जे उद्धट प्रश्न घेउन आले ते थोड्या वेळात माझ्या प्रयत्नांना हातभार ही लाऊन गेले, पण बरीच तरुण पिढी विचारुन गेली की मी करत असलेल्या गोष्टीचा काही उपयोग तरी आहे काय?
म्हणून, आज मी त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ठरविले. चला कला आणि इतिहासाकडे पाहूया याचे उत्तर मिळते का, खरचं आहे का कलेची गरज?
मागे वळुन पहिले, तर कळते की इतिहासकारांनी आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की सुरुवातीच्या मानवाने कला ही धार्मिक कारणांसाठी वापरली.
तस बघावं तर आजही आपण बहुतेकदा मंदिरे किंवा इतर धार्मिक स्थळी गेलो की कलेच्या संपर्कात येतो.

पूर्वीच्या संस्कृतीतील मानव शक्य तितकं वास्तविकतेच्या आसपास जाणार जगाचे चित्र आपल्या कलाकृतींमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीत असतं, हे तर आपल्याला ज्ञातच आहे. आणि पुढे जाऊन ह्या कलाकृती आपल्या आणि त्या काळच्या मानवामध्ये एक दुवा बनल्या.
पुरातन कला ही आपल्या इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ तसेच वैज्ञानिकांना मानवी विकासाबद्दल माहिती मिळविण्यासाठी फारच उपयुक्त ठरली आहे.
“मला वाटतं हेच कलेच महत्व आहे.”

कला, त्या त्या काळातील माणूस आपल्या आयुष्याचा अनुभव कसा घेत होता याची अचूक छाप असते. कला वृत्तपत्रांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये छापलेल्या शब्द आणि फोटोंपेक्षा बरेच काही सांगू शकते ( वृत्तपत्रे आणि ईतर कागदपत्रे कधी कधी राजकीय प्रभावाखाली असू शकतात). कारण एखादा कलाकार कधीही कोणत्याही निर्बंधाचे पालन करणार नाही. तो मनमोकळा प्रवास असतो त्याच्या मनाचा.
कला हा नेहमीच मानवी अस्तित्व आणि प्रगतीचा महत्वाचा भाग होता, पण तोपर्यंत जेव्हा दररोजच्या वस्तूंवर सौंदर्यात्मक हेतूने कलेचा वापर होऊ लागला.
तेव्हापासून अधिकाधिक उत्पादनाच्या नादात मशीन्सनी कारागिरांवर मात केली आणि कलेचे महत्व हळु हळु कमी होऊ लागले.

प्राचीन राजे त्यांच्यासोबत कुशल कारागीरांना घेउन जगभर प्रवास करायचे. त्यामूळेच आज, जगभरात पोर्तुगाल, मोगल, हिंदू आणि इतर अनेक वास्तुशिल्पाची उदाहरणे जगभर पहायला मिळतात.
आज जेव्हा आपण जीवन मरणाच्या प्रश्नाची कोडी सोडवत आहोत, तेव्हा मला वाटते की आपणही कलेला गंभीरपणे जोपासण्याची गरज आहे. या कठीण काळात मानसिक संतुलन राखण्यात ते महत्वाचे ठरेल.
आपल्या सभोवतालच्या गोष्टींचा फक्त उपयोग करण्यापलीकडे जीवनाकडे पाहणे महत्वाचे आहे, वास्तविकता आणि स्वप्नांच्या आदर्श दुनिये दरम्यानची भिंत अस्पष्ट करण्यात कला आपली मदत करु शकते.
मला वाटतं, आपला वेळ आणि शक्ती फक्त जगण्यासाठीची धडपड करणे सोडून, एखाद्या सुंदर गोष्टीवर केंद्रित करण्याची क्षमता, म्हणजेच कला!.
असो, सध्या एवढीच आशा करूया की लवकरच आपण आजचे वास्तव आणि एक सुंदर आदर्श दुनिया यांच्यातील भिंत अस्पष्ट करू.
~ कुजबुज