आयुष्य आणि आवड

तुमची आवड आणि कामधंदयाची निवड एकच असेल, तर हा लेख कदाचित तुमच्यासाठी नसावा, कारण मग तुम्ही जगातील त्या अगदी मोजक्या अद्वितीय लोकांपैकी आहात जे आपल्या कामात खरोखरचं मग्न आहेत.

परंतु आपल्यापैकी बहुतेकांसाठी, जिथे खरं तर आपली आवड सहज परिपूर्ण वास्तव बनू शकली असती, तिथे काहितरी आवडीनुसार करण, हे आपल्याला एखाद्या अस्पृश्य स्वप्नासारखं वाटू लागते.

काही वर्षांपूर्वी, गावात एकदा मतदानाचा दिवस होता आणि माझी शाळा मतदान केंद्रामध्ये रूपांतरित झाली होती.

शाळा, जिथे आम्ही एकच पोशाख घालुन 10 वर्षे स्वत:च मत बांधायला शिकताना, स्वत:चचं अस्तित्व शोधू पाहत होतो. तिथे आज बरचं नविन बांधकाम दिसत होत, जणू तिनेचं स्वत:च अस्तित्व बदलून टाकलं होत. ओळखू ही न येणारी ही आमचीच शाळा होती. त्यातुन आज ती मतदान केंद्राच्या पोशाखात माझ्याकडून एक सुंदर समाज बांधण्याची निदान आशा असणार मत मागत होती.

शाळा पूर्ण केल्यावरही आपल्या कडून असचं एक सुंदर भविष्याची आशा ठेवून मत मागितलं जात. बघावं तर आयुष्यात निर्णय घेण्याची ती आपली पहीलीच संधी असते.

पहील्यांदा दिलेल हे भावी आयुष्याच्या नौकरीधंद्याविषयीच मत, बहुदा औपचारिकता संपली की वास्तविकतेच्या चुलीत टाकून देण्यात येतं.

सुंदर आयुष्य आणि सुंदर समाजाची स्वप्ने सामान्यत: मतदानाच्या दिवसा नंतर वास्तविक आयुष्याच्या मार्गावर चालताना आपल्याला विसराविच लागतात. आपल्याला काय हवंय ते बाजुला ठेवून बहुतेकदा आपण सर्वच , काय योग्य आहे ते कुणाकडून तरी ऐकुन त्यांच्याबरोबर लवकरच व्यावहारिक जीवनाच्या रहदारीचा भाग बनतो.

ते योग्य ही असेल कदाचित, कारण तसं पाहता आपली प्रत्येक आवड पैसे कमविण्याच्या मार्ग निदान त्याक्षणी असेलच असं नाही किंवा कधीकधी ते आपल्या आईवडीलांच्या मते ‘करण्यासारखे काम’ नसते आणि काहीही झाले तरी समाजात चांगले जीवन जगण्यासाठी लागणारया पैशाचे महत्त्व हा कधीच वादविवादाचा विषय नव्हता.

घरी परतताना, मी शाळेकडे वळून पाहिले, जुन्या दिवसांची एखादी झलक निदान स्वप्नांसारखी मनातच अनुभवावी अशी बालिश आशा बाळगून. बालपण पुन्हा अनुभवता यावं ही आपली सगळयांचीच सुप्त इच्छा असते आणि तोही कधीच वादविदाचा विषय ठरू शकणार नाही.

तेवढ्यात योगायोगाने मागुन एका वर्गमित्राने पाठीवर हात ठेवला, आश्चर्य काय असत ते आज मी पुन्हा शाळेत जाऊन शिकलो. सचिनने देखील बर्‍याच दिवसांनी शाळा पहिली होती, शाळेत कदाचित आम्ही इतके जवळचे मित्र नसूही पण बदललेल्या शाळेविषयी गप्पा मारताना अचानक जवळीक आणि जवळचा मित्र यात आपली माणस आणि आपूलकी सारखं काहितरी नात दिसू लागलं.

आज, आम्हाला एकमेकांच्या ठावठिकाणांबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि जाणून घ्यायला हातात वेळही खूपच कमी होता. कारण मतदान झालं होत आणि जिथे आमच्या मताला फारशी किंमत नव्हती अश्या ठिकाणी म्हणजेच आम्हाला कामावर जायचे होते.

आयुष्य देखील, मित्रासारखे आपल्या पाठीवर हात ठेवते आणि मग हळुच वास्तविकतेकडे ढकलते.

शाळेत असताना सचिन आणि माझी एक गोष्ट समान होती. आम्ही दोघेही चित्रकलेत चांगले होतो आणि मोठे होउन आम्हाला चित्रकार व्हायचे होते.

पण आज, मी एका कॉर्पोरेट कंपनीत इंटिरियर डिझायनर आहे आणि सचिन एका बँकेत काम करतोय. मी काय करतो हे ऐकुन सचिन भलताच खुश झाला, म्हणाला छान केलेस निदान तु कलेच्या जरा जवळ तरी राहिलास, माझ्यासाठी बँकेत राहुन कलेचं गणित कधीच
सुटत नाही. तसा मी सुखी आहे वादच नाही, पण कित्येक वर्ष मी कलेसाठी साधा कागद आणि पेन्सिल हातात घेतली नाहिये, तेवढं दुख्ख आहे.

मीही व्यावहारीक जीवनात कलेला कितपर्यन्त जोपासू शकतोय हे मलाच ठाऊक होतं, पण ‘बर्‍याच दिवसांनंतर’ मी केलेल्या एखाद्या गोष्टीचे कौतुक ऐकल्यामुळे, ह्या कौतुकाला कशी प्रतिक्रीया दयावी हेच कळत नव्हतं.

नंतर कुणास ठाऊक कस, मी त्याला सहज म्हटलं “पण, कला अनुभवण्यासाठी कलेच्याच व्यवसायात असणे खरोखरच आवश्यक आहे? आपण पैसे कमावण्यासाठी जे करतो त्यापेक्षा आपली आवड किंवा कला वेगळी असू शकते की! कला ही पैश्यांपेक्षा अधिक वैयक्तिक आणि खास आहे असं नाही वाटत तुला ?

“उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा कलेकडे एक जगण्यासाठी महत्वाच्या असा सकारात्मक दृष्टीकोन म्हणून का नाही पहात आपण? व्यवसायात कला नाही म्हणून तिला आपण आयुष्यात ही स्थान देऊ नये ? निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा कागदावर काही रेषा ओढण्यास काय हरकत आहे ? “

तो हसला, म्हणाला “मी प्रयत्न करेन, मी नक्की प्रयत्न करेन”.

बघता बघता आम्ही पुन्हा अश्या मार्गावर येउन पोहोचलो, जिथून आमचे रस्ते वेगळे होणार होते. आम्ही आमच्या फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि लवकरच एक कप कॉफी आणि ड्रॉईंग बुक घेऊन भेटण्याचे ठरविले.

आम्ही पुन्हा कधीच ड्रॉइंग बुक घेउन भेटू शकलो, पण त्या दिवशी मी शाळेत अजुन एक गोष्ट शिकलो. मित्राला मी दिलेले उत्तर माझेच डोळे उघडून गेल, त्या दिवशी माझ्या आयुष्यात चांगलाच बदल झाला.

कधीकधी, जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीला सहज प्रतिसाद देतो, काहीही वास्तविकतेचा विचार न करता. तेव्हा आयुष्य आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे घेउन जाते . आयुष्याची शिकवण्याची पद्धत जरा वेगळी आहे आणि आयुष्याच्या शाळेत आपण शेवटपर्यन्त शिकतच रहातो .

मतदानाच्या दिवसाचा फायदा घेत मी ऑफिसला जाण्यापूर्वी एका आर्ट शॉपमध्ये गेलो. त्या दिवसापासून, मी माझ्या कलेचा अधूनमधुन तरी आनंद घेण्याच ठरवलं . कोणाला आवडेल की नाही, मोबदला मिळेल का फायदा होइल की नाही हे प्रश्न अचानक दुय्यम बनू लागले.

मला लक्षात आलं की पैसे कमवणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच आयुष्य आवडीनुसार जगणेही आहे. शेवटी पैसा हे एक मानवनिर्मित साधन आहे आणि आवडनिवड ही जिवंतपणे जगण्याचा पर्याय !

मला वाटते की, कला आणि कामधंद्याच नात जोडून त्यांना संसारात ढकलण्याच्या अट्टाहासापेक्षा त्यांना आपआपल्या परिने सुखी राहू दयाव.

आयुष्यातील निदान काही वेळ तरी जगण्यासाठी वापरायला हवा, मी जर तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची, कलेची किंवा स्वप्नाची आठवण करुन दिली असेल. तर अजुनही अगदी उशीर झालेला नाही.

आठवड्यातून कमीतकमी 1 तास तरी स्वत:साठी जगा, आपल्या छंदासाठी, कलेसाठी जगा. तुमच्या आयुष्यावर तुमचा तेवढा हक्क तरी नक्किच आहे! आणि कुणास ठाऊक हळुच तुमची कला तुमचा व्यवसाय बनावी !

मनात आशा असूदया , कारण आयुष्य जगण्यासाठीच असतं.

~ कुजबुज

Leave a Reply

Your email address will not be published.